Wednesday, October 24, 2018

किल्ला

          ऑक्टोबर चा महिना आला म्हणजे हवेत एक वेगळा असा मंद गारवा आणि गंध पसरलेला असतो. माहीत नाही, कदाचित मी एकटाच असेन ज्याला हा गंध जाणवत असेल, पण तो गंध हवा हवासा वाटतो. शरद ऋतू ची चाहूल म्हणा किंवा वेगळं काही खूप मनमोहक असं सगळं वातावरण असतं. याच काळात माझे आवडते सगळे सण वार येतात. दसरा, कोजागिरी, आणि सणांचा राजा म्हणता येईल असा दिवाळी चा सण. हल्ली पूर्वीसारखं राहिलं नाही हे खरंय पण जग कितीही बदललं तरी हा काळ तसाच हवाहवास वाटतोच. हल्ली दिवाळी जवळ आली की फार तर फार जरा साफसफाई करू किंवा काहीतरी नवीन कपडे घेऊन काम मोकळं करू. कदाचित मोठे झाल्याचे side effects असावे. आजकाल फटाके उडवताना सुद्धा विचार करतो, खरंच गरज आहे का वगैरे वगैरे. पण एक काळ होता 90 दशकातला, जेव्हा गोष्टी अतिशय वेगळ्या होत्या. दिवाळी ची लगबग म्हणजे बाप रे बाप. शाळेचा तो शेवटचा दिवस(दिवाळी सुट्टी च्या आधीचा) झाला रे झाला की plans ची आखणी सुरू. काय करू आणि काय नाही अशी गत. घरी आई बाबांची गडबड असायची की साफसफाई करावी, त्यात आम्ही म्हणजे जणू कमी वेतन वर असलेले मजूर. ओढून काम करून घेणार, पण त्यात मजा यायची. अश्याच लगबगीत आमच्यापुढे, (म्हणजे मी आणि माझा लहान भाऊ) एक monumental task असायचं. ते म्हणजे किल्ला बांधायचं. किल्ला म्हणलं की सर्व दिवाळीच्या plans मधला महत्वाचा प्लॅन असायचा.

           सुरुवात व्हायची अंगण साफ करण्यापासून. आता बाकीचं काही साफ होवो ना होवो, अंगण मात्र साफ झालाच पाहिजे, कारण ते आमचं भूमिपूजन असायचं. आता ते झाल्यावर सगळी सामुग्री तर आणायला पाहिजे. मग बाबा मी आणि कार्तिक(माझा लहान भाऊ) मागे ओढ्यात(घराच्या मागील बाजूस ओढा होता) जाऊन दगड आणि माती आणायचो. आता त्यावरून अनेक conflict व्हायचे. "एवढे बास झाले की", असं आई आणि बाबा दोघांकडून ऐकायला मिळायचे. पण छे, ' सस्ती चीजों का शौक हम नाहीं रखते'. अपेक्षेपेक्षा जास्त दगड आणि माती आणलीच जायची. बरं ते काम काही सोप्पं न्हवत. साधारण एक 100 मिटर अंतर असावं. तेवढं अंतर कापत एक एक करून दगड आणायचा. माती साठी ठरलेलं एक पोतं असायचाच. त्याचे एक दोन खेप झाले की माती पुरायची.

            हे एक काम झालं. आता साधारण दिवाळी च्या आधीच्या रविवारचा मुहूर्त ठरायचा आणि किल्ला बांधणी ला सुरुवात व्हायची. बाबा सगळे जड असलेले दगड बरोबर पायाशी लावत रचत जायचे. आता त्यात मी chief architect प्रमाणे "गुहा इथे पाहिजे, इथे एक गुप्त मार्ग हवा, इथे 4 बुरुज हवे आणि इथे खाली गाव हवं" असे आदेश देत काम नीट चालू आहे ना बघायचो. कडा वगैरे माझं डोमेन होतं. ते मीच करायचो. आई म्हणायची "अरे एवढे कष्ट कशाला, सरळ 4 दगड टाका आणि त्यावर पोत टाकून काम माती थोपून किल्ला करा". पण तेच की , असली पळवाट बिलकुल आवडायची नाही. पोत टाकला की मग झाडं उगवण्याचा प्रश्न यायचा आणि किल्ला फारच कृत्रिम दिसायचा. हळू हळू किल्ला shape घ्यायचा आणि मग आवडीचे काम सुरू व्हायचे, ते म्हणजे चिखल काम. सगळं अंगण भरून चिखल करायचा आणि तो बरोबर दगडांवर थोपुन मातीचा एक जाडसर layer तयार करायचा. वर शिवाजी महाराजांसाठी शामियाना आणि मग त्याला जोडून पायऱ्या आणि तटबंदी हाताने करायची. बुरुज वगैरे यांना shape देऊन झालं की खराट्याच्या कड्यानी पायऱ्यावर रेलिंग तयार करायचं. किल्ल्याच्या पायथ्याशी गाव असायचं आणि त्या साठी कोरडी मातीचा थर टाकून गाव ready करायचं. किल्ला ओला असतानाच त्यावर मोहरी किंवा हळीवाचे दाणे टाकायचे जेणेकरून बरोबर दिवाळीच्या दरम्यान जंगल तयार व्हावं. हे हळीव नावाचं पण काहीतरी असतं ते मला तेव्हा कळलं होतं. 

          आता अजून एक महत्वाचं काम असायचं म्हणजे मातीची चित्र आणायची (माझ्याकडे अजून आहेत). दर वर्षी काही नवीन आणलीच पाहिजे असा अलिखित नियम होता. ढाल तलवार असलेले मावळे, गावकरी, वाघ सिंह, हत्ती एखादा क्रूर सिंग असली चित्र आणायची. आणताना नवजात बालकाला जपू अशी जपून आणायची. चुकून टवका उडाला म्हणजे जीव खाली वर व्हायचा.  वसुबारस आल्यावर आकाश कंदील लावायचा आणि चित्र लावायला सुरुवात करायची. सगळ्यात पहिल्यांदा शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक व्हायचा. वर शामियान्याच्या चौथाऱ्यावर फुलं टाकली म्हणजे अभिषेक झाला. त्यावर शिवाजी महाराजांचं चित्र ठेवायचं. मग थोडा दरबाराचा feel देण्यासाठी त्या चौथाऱ्याच्या छोट्याश्या जागेत 5 चित्र वगैरे ठेवायची. मग हळू हळू बाकीची चित्र त्यांच्या बाकीच्या जागेवर ठेवायची. क्रूर सिंग आणि एखाद्या मावळ्याची लढाईचा सीन दाखवायचा. कुंकू ओल करून क्रूर सिंगच्या छातीवर दाखवायचं. एखादा चित्रपटाचा सेट शोभेल असा रुबाब असायचा. सिंह आणि वाघ आपल्या आपल्या गुहेत जायचे आणि नेमके त्यांच्या समोर हरीण गवत खात राहायचं. गावात, विहीर, फेरीवाले, भाजीवाले, वगैरे त्यांच्या जागेवर ठेवायचे. बरं, आता त्या भाजी वाल्या बाई ची जागा कुठे असेल , त्याची मार्केटिंग strategy बनवायची. जेणेकरून तिच्या भाज्यांचा जास्त खप होईल. जिथे जास्त चित्र असतील तिथे बरोबर तिला ठेवायचं. शेजारी कुस्ती खेळणारे ठेवायचे जेणेकरून तिला बोर नाही होणार. गावाच्या वेशीवर रांगोळी काढायची आणि सगळं अंगण झाडून किल्ल्याचं inauguration करायचं.



              आता त्या किल्ल्यावर पणत्या ठेवायच्या, गुहेत पण ठेवायच्या जे एकरून गुहेला एक गूढ आणि सस्पेन्स फील यावा.दिवाळी मध्ये दररोज किमान 2 वेळा ना चुकता किल्ल्यावर पाणी शिम्पडायचे जेणेकरून जंगल हिरवागार राहावं. नरकचतूर्दशीच्या दिवशी पहाटे उठून, अंघोळ करून, area मधला पहिला फटका वाजवायचा मान पटकावून किल्ल्यावर पणत्या लावायच्या आणि मग रांगोळी काढायची. हे असं तुळशीच्या लग्नापर्यंत चालायचं. तुळशीचं लग्न झालं की मग मनावर दगड ठेऊन कठोर निर्णय घ्यायची वेळ यायची. ती म्हणजे किल्ला dismantle करणे. त्यासाठी पण वेगळा प्लॅन असायचा. आता ते सहजा सहजी करता आलं असतं. शांतपणे माती काढून दगड एक एक करून काढून आपला प्रेमाने तो किल्ला मोकळा करायचा. पण छे. असं कसं चालेल. त्या किल्ल्यावर कोणीतरी घात करुन बॉम्ब लावला असा scene करायचा. एक छानसा टपोरा सुतळी किंवा चौकोनी बॉम्ब प्रत्येक गुहेत लावायचा. त्याने फार काही नुकसान व्हायचं नाही पण तेवढाच आपला फील. मनसोक्त बॉम्ब लावून झाले की मग finally हाताने सगळी माती बाजूला करून दगड आपले परत ओढ्याच्या किनारी ठेऊन अंगण पुन्हा चांगलं पाण्याने धुवून back to normal करायचे.

     आज मी जेव्हा रस्त्यावर बघतो, सगळं अगदी ready-made मिळतं हो. तुम्हाला काहीच करायचं नाही. अत्यंत सुबक आणि कलाकुसर असलेले तयार किल्ले मिळतील. चित्र पण fixed मिळतात. लहान मुलांना फक्त आई बाबांना convince करायचं एवढेच कष्ट. पण त्यात ती आपुलकी खरंच असेल का? आपल्या पोटच्या पोराला जपायचं तसं किल्ला असायचा. शेवटी हल्ली ते राहिलं नाही. हो मात्र गारवा असतो आणि गंध असतो. कदाचित हाच गारवा आणि गंध जुन्या आठवणींचा असावं, जो वातावरणात दरवळत राहतो आणि काहीतरी , कोणीतरी खूप लांब गेलंय याची कणकण देत राहतो. आपणच लांब गेलोय का ?

9 comments:

  1. Superb सूरज..... खुप छान लिहिलंयस...

    ReplyDelete
    Replies
    1. Thank you, your good name ? It appears as unknown here .

      Delete
  2. Mast re suraj...tu junya athavani madhe gheun gelas...really great.

    Abhijeet bhole

    ReplyDelete
  3. This comment has been removed by the author.

    ReplyDelete
  4. एकदम भारी मित्रा। परत त्या दिवसांची आठवण झाली।
    Thank you so much for reminding those golden days. All the best!! ☺️👍

    ReplyDelete
  5. वाह मित्रा खूप छान.

    ReplyDelete
  6. Khupach chan ��. Maan khup varsha mage gela

    ReplyDelete