Thursday, February 28, 2013

सोनचाफा

         सायंकाळची  ती वेळ असावी. संधिप्रकाश सुद्धा नाहीसा होत होता. क्षितिजावर लालसर आणि गर्द निळ्या रंगांच्या छटा जणू कोण्या  एका चित्रकाराने रेखाटल्या  होत्या. कुठेतरी एखाद्या टेकडीवर असावं. चिमणपाखरांची सुद्धा परतीची वेळ झाली होती. त्यांचा कलकलाट नाही म्हणता येणार, पण जणू आई आपल्या मुलांना  जसं म्हणते," चला खेळणं पुरे झालं, आता शुभंकरोती म्हणायची वेळ झाली आहे" असं वाटत होतं. ती पिले जणू त्यासाठीच आपल्या घराकडे कूच करीत होती. त्या टेकडीवर एक पाऊलवाट असावी, त्यावरूनच मी चालत होतो. त्या वेळेस आजूबाजूला कोणीच न्हवते. अचानक मला एक सुगंध जाणवला. तो सुगंध खूप हवाहवासा आणि परिचित असल्यासारखा वाटत होता. त्या सुगंधाशी माझं काहीतरी गूढ नातं आहे हे जाणवत होतं. काही पावले पुढे चालल्यावर लक्षात आले की तो सुगंध होता सोनचाफ्याचा. तो सुगंध वेगळाच होता. त्या मध्ये हलकासा नशा जाणवत होता.  
           
              रस्त्यावरील दिव्यांनी त्यांचा शेंदरी रंग जणू सर्वत्र उधळला होता. त्या दिवशी पौर्णिमा होती. पुनवेचे चांदणे स्पष्टपणे कळून येत होते. पूर्वेकडे झाडांमधून हलकासा, पिवळसर झालेला चंद्र दिसत होता. त्या वेळेस नक्कीच शरद ऋतू असावा. ते चांदणे शरदाचेच असले पाहिजे. साहजिकच मंद असा गारवा हवेत होताच. गुलाबी थंडीच जणू. कुठेतरी एखादे छोटेसे देऒल देउळ असावे. संध्याकाळच्या आरतीचा घंटानाद अस्पष्टपणे ऐकू येत होता. अगदी प्रसन्न वाटत होते. निर्मनुष्य शांतता होती. रस्त्यावर आजूबाजूला रातराणी देखील बहरली होती. अधून मधून सायली सुद्धा जाणवत होती. त्यांच्यासोबत जाई आणि जुई जणू लपंडाव खेळत असाव्या. संपूर्ण वातावरण वातावरणच सुगंधी होते. वेगळाच असा गोडवा जाणवत होता. जणू सुमन कल्याणपूर मालकंस गात आहेत. वाऱ्याची झुळूक वाहण्याचे आपले काम निमुटपणे करीत होती. त्याचबरोबर झाडांची पाने आपले नृत्य सादर करीत होती. त्या वाऱ्याच्या झुळूकेला साद देत होता तो म्हणजे सोनचाफ्याचा सुगंध. या वातावरणात तल्लीन होऊन पुढे चालतच राहिलो. काही वेळाने रस्त्याच्या बाजूला एक बेंच दिसला, त्यावर बसलो. योगायोगाने त्या बेंचवर, मला माझ्या उजव्या बाजूला एक सोनचाफ्याचे फूल दिसले. मी ते उचलले, आणि त्याचा गंध घेत राहिलो. काही क्षण तल्लीन होऊन सर्व काही विसरून जावे असे वाटत होते. काही क्षणांनी डोळे उघडले तेव्हा त्या फुलाच्या जागी "ती " होती. 
     
               खूप सुंदर दिसत होती "ती", एव्हाना अजूनच सुंदर. खुद्द सुंदरतेला सुद्धा लाजवेल असं ते सौंदर्य वाटत होतं. अगदी निखळ. त्या वेळेस तिने केशरी आणि पांढऱ्या रंगाचा चुडीदार घातला होता. पांढऱ्या रंगाची ओढणी होती. शरदाच्या त्या चांदण्याशीच जणू तुलना करावी असा तिचा गौरवर्ण. अतिशय नाजूक अशी ती काया. एखाद्या अखंड दुखः सहन करीत असलेल्या व्यक्ती ला सुद्धा काही क्षणांसाठी दुखः विसरायला भाग पाडावे , असे ते स्मित होते. गालावर हलकीशी रक्ताची शीर सुद्धा दिसत होती. गालावर खळी होतिच.कपाळावर मधोमध काळ्या रंगाची एक लहानशी टिकली होती. कानामध्ये लांबसर असे अलंकार होते.  तिच्या काही बटा वाऱ्यासोबत तिच्या चेहऱ्यापर्यंत आल्या होत्या. पुनवेच्या चंद्राला निस्तेज करतील असे ते नयन. एखाद्या गुलाबाच्या कळीला पैज लावून हरवतील असे गुलाबी ओठ होते. ओठांच्या जरासं खाली, हनुवटीवर, उजव्या बाजूला एक तीळ होता. केसांची वेणी तिने खांद्यावरून पुढे आणली होती. गळ्यामध्ये गणपती असलेली एक सोन्याची चेन होती. हातांमध्ये बांगड्या सारखे काही अलंकार होते. अतिशय सुंदर दिसत होती ती. काही काळ फक्त तिलाच न्याहाळत होतो. डोळ्यांची पापणी सुद्धा लवली नसेल. आजूबाजूच्या त्या रम्य वातावरणाचा सुद्धा आता विसर पडत चालला होता. काही वेळाने तिने स्वतःने तिचा हात माझ्या हातात दिला, आणि माझा हात घट्ट पकडला. तिचा आता स्पर्श झाला होता. अचानक मनामध्ये जणू विजांचा कडकडात झाला असावा. तीच वीज सर्वांगातून सणाणून गेली होती. नंतर तिने तिचे डोके माझ्या खांद्यावर ठेवले होते. तिच्या त्या गर्द केसांचा स्पर्श माझ्या गालांना जाणवत होता. त्याच केसामध्ये तिने माळलेला होता तो सोनचाफा. तो सुगंध आता मंत्रमुग्ध करून सोडीत होता. 
          
              नंतर काही काळ असाच गप्पांमध्ये रंगला. सर्व आठवणी अगदी ताज्या करून गेला. सर्व प्रसंग, सर्व संभाषणे, ते भांडणं, ते रुसणं , ते मनवण , ते हसणं ,ते वाट पाहणं, एकत्र खाल्लेली पाणीपुरी, अजून बरेच काही, तशाच्या तसे डोळ्यासमोर उभे राहिले होते. शेवटी तिने एक प्रश्न विचारला, " मला कधी सोडून तर जाणार नाहीस नं ? " तोच एक प्रश्न शांतता भंग करायला पुरेसा होता. सोनचाफ्याचा सुगंध आता मंदावत चालला होता. शेवटी मी डोळे उघडले. पण तेव्हा "ती" न्हवती. सोनचाफा देखील न्हवता. ते रम्य वातावरण मात्र अबाधित होते. कदाचित तो एक केवळ भास असावा. उरले होते ते फक्त पाणावलेले डोळे.