Friday, January 27, 2012

पाउलवाट....

              आयुष्य हा एक प्रवासच म्हणावा लागेल. जन्मापासून ते मरण. या प्रवासामध्ये अनेव वाटा, सोबती, अडथळे आणि गमतीजमती येतात. काही वाटा चुकीच्या असतात तर काही बरोबर , काही खडतर तर काही सोप्या, काही लांब तर काही लहान, काही अंतहीन तर काही संपणाऱ्या. जो जी वात निवडेल त्याप्रमाणे त्याचे आयुष्य ठरत असते. त्याचप्रमाणे त्याला अथवा तिला सुख, समाधान, दुख, यश , आणि नशीब लाभते.
             या वाटांवर चालताना आपल्याला अनेक व्यक्ती भेटत असतात. काही वेळा त्यांचा रस्ता आणि आपला रस्ता हा एकच असतो. तर कधी काही काळासाठी ते आपल्यासोबत असतात. एखादी व्यक्ती आपल्यासोबत आयुष्यभर असते, तर काही वेळा तसं घडेलच असं नाही. अनेकदा आपली वाट आपल्यालाच चालावी लागते. एखादी व्यक्ती आपल्या प्रवासात आपल्या बरोबर येणे हा पूर्ण नियती चा खेळ असतो. नियती ठरवते  त्या व्यक्ती चे आपल्या प्रवासातील काम, तिचे येणे किंवा जाणे. या सर्व येणाऱ्या व्यक्तीमध्ये एक गोष्ट मात्र समान आहे, ती म्हणजे प्रत्येक व्यक्ती आपल्याला काहीतरी शिकवून जात असते आणि त्या सोबत आठवणी देते. आपण सुधा कधी कधी हेच करत असतो काळात किंवा नकळत. आपण सुधा एखाद्याच्या आयुष्यात येऊन त्याला काहीतरी शिकवून जातो आणि आठवणी देतो. 
             या प्रवासात आपण कधी कधी वाट चुकतो तर कधी कधी चुकीचा सल्ला आपल्याला दुसऱ्या वाटेवर नेऊन पोचवतो. पण सर्वांच्या प्रवासाचे पोहोचण्याचे ठिकाण मात्र एकच असते. प्रत्येकजण आपल्या इच्छापूर्ती आणि सुख या दिशेने जात असतो. पण प्रत्येकाची सुखाची आणि इच्छापूर्ती ची परिभाषा वेगळी असते. त्यामुळे प्रत्येक जन आपल्या स्वतंत्र वाटेवर चालत असतो. वाटेत येणाऱ्या अनेक व्यक्ती आपल्याला दिशादर्शकाचे काम करत असतात. पण प्रत्येक जन हि एक वेगळी वाट सांगत असतो, कारण त्याची सुखाची परिभाषा वेगळी असते. या सगळ्या गोंधळामध्ये आपल्याकडे एक नकाशा मात्र आहे. ते म्हणजे आपले मन.
आपले मन आपल्याला अनेकदा दिशा दाखवत असते आपण आपण त्या वाटेवर चालत असतो.
             पण हे मन सुद्धा चंचल आहे, काळानुरूप ते सुद्धा बदलत असते. त्यामुळे काही काळ बरोबर वाटणारी वाट आपल्याला चुकीची वाटू शकते. चुकलेल्या वाटेवर परतीच्या वाटा परत कालच बंद करून टाकतो. त्यामुळे आपल्याला आपल्या सुखाच्या परिभाषेत बदल करून पुढे चालावे लागते.
            एक व्यक्ती सांगते " ही वाट चुकीची आहे, तू  खूप आधी रस्ता बदलावा हवा होतास. " पण त्याच वाटेवरील दुसरी व्यक्ती आपल्याला सांगते " तू बरोबर वाट निवडली आहेस. इथेच चालत रहा. " सर्वांचा नकाशा चंचल आहे. एक वाल हि कधीच सारखी राहत नाही. ती नेहमी बदलत असते. सर्वांचा प्रवास अनिश्चित आहे आणि त्याचंह रस्ता हा वर्तमानाशी निगडीत आहे. सुख हि अशी एक गोष्ट आहे कि जी कधीच सध्या करता येत नाही. कोणी तिच्या खूप जवळ जाऊ शकते पण ती कधीच साध्य करता येत नाही. इच्छापूर्ती हे सुद्धा सुखाचेच दुसरे रूप म्हणावे लागेल. त्यामुळे आपण सर्व सुखाचा फक्त पाठलाग करत असतो.
          मग प्रश्न असं पडतो कि "आयुष्य नेमका आहे तरी काय? जर आपल्याला ज्या ठिकाणी जायचा आहे ते ठिकाण कधीच येणार नसेल तर का चालत राहायचं ? " माझ्या मते आयुष्या हे प्रवास आणि पोहोचण्याचे ठिकाण यांचे संमिश्र रूप आहे. या प्रवासातच प्रत्येक क्षणामध्ये सुख लपलेलं आहे. ते वेचत चालत राहायचं. दुःखाच्या मोठ्या पहाडावर सुधा सुखाची एखादी लहान काळी उमललेली असतेच. प्रवास बदलत राहतो आणि आपली ठिकाणे सुद्धा. या प्रवासाचा आनंद  घेत राहणे हीच एक सुखाची सोपी आणि न चुकणारी परिभाषा आहे.
          प्रवासात येणाऱ्या व्यक्ती, त्यांच्या कडू गोड आठवणी, त्यांचे अनुभव, येणारे दुखः या सर्व गोष्टींची चव चाखत पुढे चालत राहायचे. वाटेतील प्रेक्षणीय स्थळे डोळ्यात भरून ठेवायची. जेव्हा काल प्रवासाची सांगता करतो तेव्हा मागे वळून पहायचे. तेव्हा आपल्याला दिसतात ते म्हणजे आपल्याच पाउलवाटेवर लांबवर पसरलेले आपल्या पावलांचे ठसे आणि सोबत वेचलेल्या कडू गोड आठवणी. या सर्वांकडे बघून जेव्हा चेहऱ्यावर स्मित खुलते तेच आपले शेवटचे ठिकाण असते. तीच  इच्छापूर्ती असते .

6 comments: